चंद्रशेखर बावनकुळे File Photo
नागपूर

Reservation News| आरक्षणाबाबत काँग्रेसची नक्की भूमिका काय? : चंद्रशेखर बावनकुळे

गणेशोत्सवात आंदोलन करणे योग्य नाही

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : आरक्षणाबाबत काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली आहे. ओबीसी आरक्षण कायम ठेवा, जातीय जनगणना करा, असे राहुल गांधी म्हणतात, मात्र महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते ओबीसी आरक्षण काढून मराठ्यांना देण्याची भाषा करतात. त्यामुळे काँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत त्यांची नक्की भूमिका काय? हे स्पष्ट करावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी (दि.२८) केले आहे. तसेच आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या काळात आंदोलन करणे योग्य नाही. चार दिवसांनी आंदोलन झाले असते तरी हरकत नव्हती, असेही बावनकुळे म्हणाले.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय झाला. मराठा आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून न देता स्वतंत्र द्यावे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी खूप काम केले. त्यांच्यावर जातीवरून टीका करणे चुकीचे आहे. ते अष्टपैलू नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.

काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय? नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला का? काँग्रेसने यावर ठराव घेतला का?” असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. कॉंग्रेसने अशी नौटंकी करणे आणि सरड्यासारखे रंग बदलणे यातून काहीही स्पष्ट होत नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घ्यायचे का? की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे. याबाबत काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांची कुठली भूमिका आहे, हे स्पष्ट केले पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले. राहुल गांधी मतदारांची दिशाभूल करत आहेत. २०१४ ते २०२४ या काळात आम्ही विकासासाठी काम केले. काँग्रेसमधून नेते बाहेर पडत असल्याने राहुल गांधी खोटे आरोप करत आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT