

जुन्नर: सरकारच्या हातात असताना,न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला अशा शब्दांत मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले,मुंबईच्या आझाद मैदानावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला मार्गस्थ होण्यापूर्वी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मरण्याचीही तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले.
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख,आंतरवालीचे सरपंच पांडूरंग तारख,हनुमान मुळीक,ज्ञानदेव काशिद,गंगाधर काळकुटे,बद्रीनाथ तारख,संजय गोडसे, जुन्नरमधील विविध पक्षांचे नेते सत्यशील शेरकर,ज्ञानेश्वर खंडागळे,मकरंद पाटे,सूरज वाजगे, सकल मराठा समाजाचे गणेश महाबरे,संदेश बारवे, सुनिल ढोबळे,प्रवेश देवकर आदी यावेळी उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत शिवनेरी मार्गावर आंदोलकांनी मराठा आरक्षण घेणारच असा एल्गार केला. (Latest Pune News)
किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंदोलक कार्यकर्ते शिवाई देवी मंदिरात आल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर,ते शिवजन्मस्थळी नतमस्तक झाले.तेथील माती कपाळी लावून,आरक्षणाची लढाई आता आरपार असेल असे घोषीत केले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना,त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. गरीब मराठ्यांचा अपमान करू नका,त्यांची मने जिंका असे सांगून खरं तर सत्ता दिली मराठ्यांनी पण तुम्ही उलटले मराठ्यांवर या शब्दांत जहरी टीका त्यांनी केली.
मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी ही लढाई सुरु आहे.रायगड आणि शिवनेरी ही प्रेरणास्थळे आहेत. येथे आल्यानंतर यश मिळते हा इतिहास असल्याचे सांगून मराठा विरोधी आडमूठी भूमिका सोडून द्या,असा ईशारा राज्य सरकारला दिला.
आम्ही तर आरक्षण मिळवणारच आता थांबणार नाही असे सांगून जर एक दिवसाचे उपोषण करायला सांगता तर एक दिवसात आमच्या मागण्या का मान्य करत नाहीत,वारंवार माझ्या समाजाचा माझा अपमान करतात कारण मी मॅनेज होत नाही,हे त्यांचे दुख आहे.छत्रपतींच्या विचारावर चालणारे सरकार छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्या मराठ्यांवर गोळ्या घालणार का हा प्रश्न आहे असे ते म्हणाले.
आमचे आंदोलन कायदा आणि न्यायालयाने दिलेले नियम पाळून सुरु आहे.आम्ही कायदा तोडत नाही.पण आमच्या आंदोलनाला तुम्ही हात लावाल तर माझा समाज महाराष्ट्रभर आहे हे सरकारने ध्यानात घ्यावे असा इशारा त्यांनी दिला.या आंदोलनामुळे गणेशोत्सवात अडथळा होत असल्याचा आरोप होत आहे,यावर बोलताना अडथळा करायला आमच्या हातात बंदुका आहेत का असा प्रतीप्रश्न जरांगे यांनी केला.
हिंदुंचा सण असून तुम्ही मुंबईला चाललात म्हणणारे ज्यावेळी आंतरवालीत आंदोलन सुरु होते,त्यावेळी गणपती बसले नव्हते का,मग हिंदूंच्या सणाच्या वेळी लाठीचार्ज केला ते सरकारला चालते का असे सांगून आम्ही गोळ्या झेलायला तयार मात्र आरक्षणासाठी हटायला तयार नाही,मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणातून आरक्षणाचा विचार सरकारने करावा असा पुनरुच्चार त्यांनी केला.