Congress leader Vijay Wadettiwar News
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य हेतू म्हणजे देशात, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारतातील एकात्मता भंग करणे, देशात अस्थिरता निर्माण करणे हा होता अशी भावना काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. दंगल घडविण्यासाठी मुस्लिम इतिहास पुसण्याचे, बदलण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. दरम्यान वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यात धर्म विचारून गोळीबार करायला दहशतवाद्यांकडे वेळ होता का? असे वक्तव्य केले आहे.
मुळात दहशतवादी आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारत एक आहे आणि एक राहील! असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
नरहरी झिरवळ आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची माहिती घेतली पाहिजे. निवडणुकीदरम्यान भाजप आणि महायुतीने बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता सरकार पळवाटा शोधत आहे. यावरून सरकारची नियतच खोटी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.