नागपूर, पुढारी वृत्तसेवा: बुर्शीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई म्हणून काटोल व नरखेड तालुक्यासाठी ९ कोटी ५८ लाखांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. त्याला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. ही मदत शेतकऱ्यांच्या खातात तातडीने जमा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी केली आहे.
काटोल व नरखेड तालुक्यात सात महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीवर बुर्शी रोग होता. मोठया प्रमाणात फळगळ झाली होती. या संदर्भात देशमुख यांनी संत्रा उत्पादकांना सोबत घेवून नागपुरात मोठे आंदोलन केले. यानंतर सर्व्हे करुन तो अहवाल शासनाला सादर करण्यात आला. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काटोल तालुक्यासाठी 19 कोटी 43 लाख रुपये तर नरखेड तालुक्यासाठी 28 कोटी 88 लाख असे एकूण 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.
परंतु, या सर्व्हेमधून अनेक संत्रा व मोसंबी उत्पादक सुटले. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करुन काटोल तालुक्यासाठी 4 कोटी 78 लाख रुपयाची तर नरखेड तालुक्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपयाची मागणी करण्यात आली. परंतु अद्यापही त्याला मंजुरी देण्यात आली नाही, असेही देशमुख यावेळी म्हणाले.