

नागपूर: जागतिक लॉजिस्टिक मार्केटमध्ये निर्यात वाढवायची असेल तर वाहतुकीचा खर्च कमी करावा लागेल. डिझेलची वाहने कमी करा, एलएनजी वाहनांनी इंधनावरील 50 टक्के खर्च कमी होईल. इलेक्ट्रिक, सीएनजी हायड्रोजन या पर्यायाचा विचार करा, देशांतर्गत मालवाहतुकीसाठी देखील याचा नक्कीच उपयोग होईल असा सबुरीचा सल्ला केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. वोल्वो ट्रक्स इंडियाच्या वतीने भारतातील पहिल्या रोड ट्रेन या प्रकारातील मालवाहतुकीच्या अवाढव्य वाहनाला हिरवी झेंडी दिल्यानंतर ते आज (दि.१५) बोलत होते.
यावेळी व्हीइसीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विनोद अग्रवाल, कार्यकारी उपाध्यक्ष बी दिनकार, के.सी शर्मा, सुरज सहारन आदी मान्यवर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, भारताच्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजसाठी आजचा दिवस मोठा आहे. एकीकडे चीनची लॉजिस्टिक कॉस्ट 8 टक्के, यूएसए, युरोप 12% तर भारतात ती 16% ही मोठी तफावत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपण मागे पडतो. आता हळूहळू हे प्रमाण 9% वर येत आहे ते दीड टक्क्यावर आल्यास आपण नक्कीच या क्षेत्रात झपाट्याने पुढे जाऊ शकतो. निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल.
आज देशांतर्गत रस्ते,पूल उत्तम झाले आहेत. अशावेळी तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या वोल्वो समूहाने चालकांना प्रशिक्षित करावे, 22 लाख कोटी रुपयांवर होणारा इंधनावरील खर्च कमी केल्यास देश प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिझेलची वाहने कमी झाल्यास प्रदूषण कमी होईल आणि मालवाहतूकदारांचा फायदा अधिक होईल. आज आपण जागतिक मानकांवर अनेक कायदे,नियम कडक करीत आहोत याकडे आवर्जून लक्ष वेधले.
प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक विनोद अग्रवाल यांनी स्वीडन मध्ये जाऊन अभ्यास केल्यानंतर आमच्या तंत्रज्ञांनी मालवाहतुकीत क्रांतिकारी पाऊल असलेले हे वाहन तयार केले. यात एका ट्रॅक्टरसोबत दोन ट्रेलर आहेत ते वाढविता येतात.आज 55 टनची क्षमता आहे ती 65 ते 70 टन करण्याचा आणि आता रस्ते चांगले झाल्याने किमान 50 किलोमीटर प्रतितास असलेली वाहनाची गती 70 किलोमीटर प्रतितास व्हावी असा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.