नागपूर - बिल न वाचताच काही लोक या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहेत. मात्र या माध्यमातून ते कडव्या डाव्या विचारांनाच नकळत पुढे नेत आहेत. त्यांना सहकार्य करीत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी माध्यमांशी बोलताना केला.
जनसूरक्षा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याचा मला आनंद आहे. या संदर्भात मोठी लोक तांत्रिक प्रक्रिया आपण पूर्ण केली. 25 लोकांची संयुक्त संसदीय चिकित्सा समिती गठित केली. या समितीचा रिपोर्ट एकमताने आला. 12 हजार सूचना आल्या. दोन्ही सभागृहात चर्चेअंती हे विधेयक मंजूर करण्यात आले. भारताचे संविधान न मानणाऱ्या, ते उलथून टाकणाऱ्या शक्तीविरोधात यामुळे कारवाई करता येणार आहे.
कुठल्याही आंदोलन करण्याचा, सरकारला विरोध करण्याचा, बोलण्याचा किंवा लिहिण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या माध्यमातून काढून घेण्यात आलेला नाही. मात्र प्रथमच कुठल्याही एका संघटनेवर कारवाई करण्यासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधी व्यक्तीविरोधात कारवाई करावी लागत होती. यानिमित्ताने न्यायालयासारखी सर्व व्यवस्था उभी केली असून आधी त्या मंडळापुढे पुराव्यांसह जावे लागणार आहे. यानंतरही संबंधित संघटनेला 30 दिवसात उच्च न्यायालयात जाता येणार आहे. यामुळेच ज्यांनी हा कायदा वाचला नाही. त्यांनी याबाबत विरोधाची भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाच्या क्रिमिनल जस्टीस सिस्टीम संदर्भात गतिशीलता हवी याकडे लक्ष वेधत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शंभर वर्षानंतर अनेक कायद्यात बदल केले आहेत. या बदलाचे त्यांनी स्वागत केले. यात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता या तीन कायद्याचे आणि या माध्यमातून क्रिमिनल जस्टिस सिस्टिम बदलाचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वागत केले.
ॲड. उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्तीचा मला अतिशय आनंद आहे. नामवंत विधिज्ञ ज्यांनी ज्यांनी अनेक केसेस देशाच्या शत्रुविरुद्ध लढविल्या. त्यांच्या प्रयत्नातून अनेक दहशतवाद्यांना शिक्षा मिळाली. राष्ट्रपतींनी त्यांचे नाव निश्चित केले. राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. ऍड निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ विधीज्ञ व्यक्तीला राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवले गेले. भविष्यातही राष्ट्रभक्तीच्या भावनेतून न्यायपालिका आणि संसदेत देशाच्या शत्रू विरोधात ते लढत राहतील असा विश्वास आहे.