

Anil Deshmukh on Jan Suraksha Bill
नागपूर : महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याचा ईडीप्रमाणेच राजकीय विरोधासाठी गैरवापर होऊ शकतो. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेत जाईल. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि राजकीय पक्षांमध्ये या कायद्याबद्दल भीती आहे. आंदोलन केल्यानंतर आपल्यावरही कारवाई होऊ शकते, अशी भीती असल्याचा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
मुळात ईडी कायदा अंमली पदार्थ आणि दहशतवाद विरोधात आणला गेला. परंतु राज्यकर्त्यांनी राजकीय विरोधासाठी त्याचा वापर केला. तसाच गैरवापर जन सुरक्षा कायद्याचा होऊ शकतो, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा यासंदर्भातील समितीत समावेश असताना त्यांनी विरोध का न केल्याबाबत विचारले असता देशमुख म्हणाले. या कायद्याबाबत अनेकांनी भीती व शंका व्यक्त केली.
सभागृहात देखील मत व्यक्त केले. एकनाथ शिंदे गटातील संजय शिरसाट यांना प्राप्तिकर खात्याची नोटीस आली. त्यांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव का घेतले कळले नाही. महाराष्ट्रात आपल्याच पक्षाचे वर्चस्व रहावे, यासाठी कोणाची शक्ती कमी केली जात आहे. यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांची सर्वांना कल्पना आहे, असा टोला देशमुख यांनी भाजपला लगावला.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर उद्योजक, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोप केले. राज्याने हे प्रकरण सीबीआयला सोपविले. प्रकरण दाबण्याचे प्रयत्न होतील असे दिसत होते. नेमके तसेच झाले. भाजपकडून सिंग यांना वाचवण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.