Nagpur Compressed Biogas Project
नागपूर: महानगरपालिकेतर्फे नागपूर शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या भांडेवाडी परिसरात देशातील पहिला 'ड्राय डायजेशन' आधारित कॉम्प्रेस बायोगॅस गॅस (सीबीजी) प्रकल्प उभारण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर निता ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. पाहणीनंतर हा प्रकल्प नागपूरच्या पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.
पाहणी दरम्यान आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री. प्यारे खान, आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, मनपाच्या अधीक्षक अभियंता श्री.श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री राजेश दुफारे, झोन सभापती श्रीमती उमा देशमुख यांच्यासह इतर सभापती नगरसेवक यांच्यासह केवा सुसबिडीचे श्री.वीरेंद्र ठाकूर, श्री. विनोद टंडन, श्री. विजय चिपळूणकर उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका आणि नेदरलॅडच्या सुसबिडी यांच्याद्वारे भांडेवाडीतील ३० एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मौल्यवान उपपदार्थ मिळवणे, हे या 300 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे २८ टीपीडी गॅसची निर्मिती होणार आहे. तसेच सुमारे १२० टीपीडी दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती केली जाईल,
दररोज सुमारे ४०० टीपीडी आरडीएफ तयार होईल, ज्याचा वापर सिमेंट कारखाने व इतर उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, हा प्रकल्प पूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून उभारण्यात आला आहे. यासाठी महानगरपालिकेला कोणतीही 'टिपिंग फी' द्यावी लागणार नाही.