

Dawlameti Elderly Couple Dead
नागपूर : आयुष्याच्या उत्तरार्धात एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व्यथा सांगणारी एक घटना पुढे आली आहे. डवलामेटी येथे एका बंद घरात वृद्ध दांपत्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. बंद घरातून येणाऱ्या दुर्गंधीने या घटनेचा उलगडा झाला.
वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी येथील म्हाडा कॉलनीत वास्तव्यास असलेले गंगाधर भोंगाडे (वय ७५) आणि कौशल्या भोंगाडे (वय ७०) अशी मृतकांची नावे आहेत.
जावई घरी आले असता घर बंद आढळले. घराच्या आतून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांना गंगाधर भोंगाडे यांचा मृतदेह स्वयंपाकघरात, तर कौशल्या भोंगाडे यांचा मृतदेह शयनकक्षात आढळून आला.
आता या दाम्पत्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा मृत्यू झाल्याचा तसेच घातपाताचा देखील अंदाज व्यक्त होत आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.