पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीस यांनी ईव्हीएमवर घेतल्या जात असलेल्या शंकावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'मी आधुनिक अभिमन्यू आहे. त्यामुळे मला चक्रव्यूह भेदता येते. त्यांनी माझ्या चारी बाजुला हर एक प्रकारे चक्रव्यूह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण मी हे सर्व चक्रव्यूह भेदले. याचे श्रेय मी माझ्या पक्षाला, सहकाऱ्यांना आणि जनतेला देतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितले. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आज (दि.१९) चौथा दिवस आहे.
'एक है तो सेफ है'ला जनतेने प्रतिसाद दिला. जनतेने महायुतीला घवघवीत यश मिळवून दिले. विरोधकांच्या मनात पाप आहे, जनतेच्या मनात नाही. खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
भारतीय निवडणुकीत परकीय शक्तीचा वापर केला जातोय याचे पुरावे आलेत. विरोधक त्यांचा खांदा दुसऱ्याला वापरू देतायेत. विरोधकांनी निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहादचा नारा दिला, असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान एकाही पक्षाने स्वीकारले नाही. संविधानात्मक संस्थाविरोधात जनमत तयार करणे म्हणजे देहद्रोहच. यापूर्वी शरद पवार यांनी कधीच ईव्हीएमचा मुद्दा मांडला नाही. ईव्हीएमवर मतदान घेऊनच मनमोहन सिंग यांचे आले होते ना? यूपीएचे सरकार आले होते तेव्हा विरोधकांसाठी ईव्हीएम चांगले होते, असा सवाल त्यांनी केला.
लोकशाहीत दादागिरी खपवून घेणार नाही, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, असेही ते म्हणाले. ज्या योजना आम्ही सुरू केल्यात. त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत जी योजना किंगमेकर ठरली; ती लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिले.