Child marriage prevented in Katol taluka of Nagpur
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. याची माहिती जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळाली. पथकाने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह थांबवण्याची कारवाई केली.
अक्षय तृतीयेच्या पर्वावर काही समाजामध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. डोंगरगाव येथील मुलीचे (वय 15) तर कन्हान येथील मुलीचे (वय 17) असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत समोर आले आहे. जिल्हा बाल संरक्षण पथक पोहोचण्यापूर्वी दोन्ही ठिकाणच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. यावेळी मुला मुलीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती सोबतच कायद्याची भीती असणे गरजेचे आहे. त्यामुळे या कारवाईत मंडप डेकोरेशन, आचारी आणि डीजे चालकालाही नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढे कुठल्याही लग्नाची ऑर्डर घेताना मुलीचे वय तपासून घेतल्यावरच ऑर्डर घ्यावी, अन्यथा एक लाख रुपयांचा दंड करण्यात येईल असे नोटिसीत बजावण्यात आले आहे.
आजच्या एकविसाच्या शतकातही बालविवाहाच्या घटना समोर येत असतात. बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच बालविवाह करणे आणि लावून देणे हे गुन्हा ठरत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होउ शकते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि बालविवाहाचे बालकांवर होणारे दुष्परीणाम याची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी समाजप्रबोधन, शिक्षणाचा प्रसार, साक्षरता यांची सांगड घालून या अनिष्ठ प्रथांमुळे होणाऱ्या दुष्परीणामांची माहिती देणे आवश्यक आहे.