नागपूर : पुढारी वृत्तसेवा; अभाविप मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विचारांच्या प्रचारासाठी आणि शिक्षण क्षेत्रात परिवर्तनासाठी काम करीत आहे. पण सध्या नामशेष होत चाललेले माओवादी विचार पुन्हा प्रसारित करण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. त्यांची वाटचाल अराजकतेकडे आहे. यासाठी त्यांनी कॉलेज कॅम्पसला माध्यम बनविले. या विचारांचे प्रदूषण नष्ट करून राष्ट्रवादाचे बीजारोपण करण्याची जबाबदारी आपली आहे. ती कटाक्षाने पूर्ण करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित विदर्भ प्रांताचे ५३ व्या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सोलर इंडस्ट्रीचे संस्थापक सत्यनारायण नुवाल, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, विदर्भ प्रांत अध्यक्ष नितीन गुप्ता, मंत्री पायल किनाके, स्वागत समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सचिव आशिष उत्तरवार, नागपूर महानगर अध्यक्ष डॉ. अभय मुद्गल, मंत्री दुर्गा भोयर, विदर्भ प्रांताध्यक्ष श्रीकांत पर्बत आदी यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी संघर्ष म्हणजे काय? ते अभाविपमध्येच शिकायला मिळाल्याचे सांगितले. श्रीनगरच्या लाल चौकात सर्वप्रथम तिरंगा झेंडा फडकवण्याचे कार्य विद्यार्थी परिषदेनेच कसे केले? याची आठवण त्यांनी ताजी केली. नवीन शिक्षण धोरणाद्वारे मूल्याधारित पिढी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादाचे बीजारोपण कसे करता येईल? याचा विचार करून समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद युवकामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डिपेक्स प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अभय मुद्गल यांनी, तर आभारप्रदर्शन आशिष उत्तरवार यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी खासदार अजय संचेती, माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, उद्योजक आशिष फडणवीस, अॅड. पारिजात पांडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मंदार भानुसे, संघटन मंत्री देवदत्त जोशी, पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री गितेश चव्हाण, विदर्भ संघटन मंत्री विक्रमजित कलाने, डॉ. धामणकर यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.