राजकारणात येण्याची घाई नको : नितीन गडकरी

ABVP convention: अभाविपचे ५३ वे विदर्भ प्रांत अधिवेशन
ABVP  convention
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३व्या विदर्भ प्रांत अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्यासह केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी. pudhari photo
Published on
Updated on

नागपूर : उत्तम प्रशिक्षण, संस्कार झाल्याशिवाय राजकारणात जायला नको, पाच वर्षे उत्तम काम करायचे आणि त्यानंतर राजकारणात जायचे, असे मला मदनदासजींनी सांगितले.मला राजकारणात यायची घाई नव्हती. पण त्यांच्या उपदेशांचा मला फायदाच झाला अशी कबुली केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आजचा उत्तम नागरिक कसा असावा, हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सांगितले जाते. आपण कार्यकर्त्याला गुणदोषांसह स्विकारतो. कारण कुणीही परफेक्ट नाही. आपण विद्यार्थी जीवनात, विद्यार्थी परिषदेत काम करताना आपले व्यक्तिमत्व कसे घडविले जाणार आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे. कारण विद्यार्थी परिषद तुमचे व्यक्तिमत्व घडविणार आहे, असे प्रतिपादन गडकरी यांनी आज मंगळवारी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सुरुवात झाली. अधिवेशनातील ‘रिअल लाईफ रोल मॉडेल’ या सत्रात गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रांत अध्यक्ष श्रीकांत परबत,सुनील गौरदीपे, मोहिनी हेडाऊ, प्रशांत कुकडे आदींची उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनचरित्रावर संबंधित व्हिडिओचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले.

गडकरी म्हणाले, ‘ज्ञान चरित्र एकता… यही हमारी विशेषता, हेच आपल्याला विद्यार्थी परिषदेत शिकायला मिळते. मी देखील विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था या सर्वांचा एक शैक्षणिक परिवार असावा, अशी परिषदेची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांचे कर्तृत्व कसे घडवता येईल, यादृष्टीने संस्कार करणारी एक संघटना म्हणून परिषदेचा लौकीक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक आहे. विद्यार्थी परिषदेत प्रत्येक जण काहीतरी शिकलेला आहे. मी व्यक्तिगतरित्या काम सुरू केले, तेव्हा माझी रुची महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होती. पण मला इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घाईने राजकारणात जायला नको, याची शिकवणही मिळाली.

संघटनात्मक कार्य, रचनात्मक कार्य आणि आंदोलनात्मक कार्य, या तीन गोष्टींचा विद्यार्थी परिषदेत वारंवार उल्लेख होतो. ‘चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है’, हा आपला मुख्य उद्देश आहे. वंचितांचे आयुष्य बदलविण्याचे आपले काम आहे. समाजोपयोगी काम करण्यावर भर देण्याची गरजही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news