Nagpur Contribution To Judiciary
नागपूर : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा वकील संघटना आणि उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे काम करतांना बऱ्याच गोष्टी आत्मसात करता आल्या, अशा भावना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मोकळेपणे व्यक्त केल्या.
जिल्हा व सत्र न्यायालय येथे नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती अभय मंत्री आणि नागपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने देशाला महान वकील व न्यायाधीश दिले. जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे राहिले आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाद्वारे जनहित याचीकांचा प्रभावी उपयोग होवून जनहिताचे कार्य झाले. या तीनही संस्थांमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होताच विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवून यामाध्यमातून गोरगरीब आणि शेतकऱ्यांना न्याय देता आला. याचे समाधान असल्याचे आवर्जून सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात घटना समितीच्या सदस्यांनी भारत देशाला अभूतपूर्व अशी राज्यघटना दिली. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूता या मुल्यांद्वारे राज्यघटना देशाला मार्गदर्शन करीत असून सामान्य व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण न्यायपालिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळतांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका कायम ठेवणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार सन 2001 मध्ये झोपडपट्टया काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात बजावलेल्या भूमिकेची आठवण सांगत हजारो झोपडपट्टी वासीयांचा निवारा वाचवू शकल्याच्या भावना त्यांनी मांडल्या. नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्यात यश आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विधी क्षेत्रातील एकूण 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि इमारतीच्या परिसरात तीन भाषांमधील संविधान उद्देशिकेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या हस्ते डिजिटल ग्रंथालयाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
नागपूर जिल्हा वकील संघटना आणि विदर्भातील विविध विधी संघटनांच्या वतीने यावेळी न्या. गवई यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव मनिष रणदिवे यांनी आभार मानले.