Certificate will not be given only as an entry in the Gazette: Revenue Minister Bawankule
नागपूर : पुढारी वृत्तसेवा हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंद सापडली म्हणून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही. अधिकारी नियमानुसारच सही करतील. तसेच, कोणत्याही जात प्रमाणपत्राला आव्हान देता येऊ शकते, असे महसूलमंत्री तथा ओबीसींसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी ते येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंद आढळली, या एकमेव कारणास्तव कोणालाही कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही. त्यासाठी अधिकारी नियमानुसार व्यवस्थित छाननी करतील. त्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्रावर सही केली जाईल.
तसेच, हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवरून ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ नाराज नाहीत, अशी माझी माहिती आहे. तरीसुद्धा त्यांचा काही आक्षेप असेल तर त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. दरम्यान, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत लागू करण्यात आलेल्या झीरो रोस्टरसंदर्भात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर ते म्हणाले, याचिका दाखल करणे हा याचिकाकर्त्यांचा अधिकार आहे. राज्य शासन कुठलाही अधिनियम कधीही वापरू शकते. याबाबत आम्ही आमची बाजू मांडू.