नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ३ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. (Nagpur Umred Factory Blast)
या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनेला जबाबदार कोण, याविषयीचा अहवाल एका पत्राद्वारे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडून मागितला होता. हा अहवाल येताच उमरेड पोलिसांनी कंपनी महाव्यवस्थापक तेन्नेटी नरसिंग मूर्ती (वय 56) , सुरक्षा अधिकारी रमण रामचंद्र भाजीपाले (वय 50) , शिफ्ट मॅनेजर अमित शंकर बचाले (वय 38) या तीन जणांवर निष्काळजीपणा, कामगारांना योग्य सुरक्षा, प्रतिबंधात्मक उपकरणे आणि याबाबत प्रशिक्षण दिले नसल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले आहेत.
तर दुसरीकडे मृतदेहाची डीएनए चाचणी केल्यानंतर पाचही जणांची ओळख पटली आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात पाचही कामगारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीषण स्फोटानंतर आगीत होरपळून निखिल निहारे (वय 24) , निखिल शेंडे (वय 25), अभिषेक जागड (वय 20), पीयूष वासुदेव दुर्गे (वय 21), सचिन मसराम (वय 26) या पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. तर कमलेश ठाकरे, पीयूष टेकाम, मनीष वाघ, करण बावणे, नवनीत कुंभारे, करण शेंडे या सहा जखमी कामगारांवर आधी नागपुरातील मेडिकल रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.