Drugs Sale Pudhari
नागपूर

Nagpur Crime: धक्कादायक! नागपूरच्या भाजयुमोच्या तालुकाध्यक्षाला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक

Katol Vaibhav Kale BJP | काटोल येथील वैभव दिलीपराव काळे हा भाजयुमोचा तालुकाध्यक्ष असून तो डोरली भांडवलकर ग्रामपंचायतीचा सरपंचही आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Katol Vaibhav Kale BJP Arrested

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण उघड झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावरच भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षाचा ड्रग्ज तस्करीशी थेट संबंध असल्याचे समोर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काटोल येथील वैभव दिलीपराव काळे हा भाजयुमोचा तालुकाध्यक्ष असून तो डोरली भांडवलकर ग्रामपंचायतीचा सरपंचही आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत वैभव काळेसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून 34 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची बाजारात किंमत साधारण 6 लाख 50 हजार रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले.

गांजा तस्करीचे जाळे उघडकीस

वैभव काळे गेल्या अनेक दिवसांपासून गांजा तस्करीत सहभागी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर माध्यमातून मिळत होती. त्या माहितीची खातरजमा करून जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला सखोल कारवाईचे आदेश दिले.

या टोळीमध्ये वैभव काळेचा जवळचा सहकारी समीर विजयराव राऊत हा मुख्य भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे. समीर हा व्यवहार, पुरवठा, वाहतूक आणि संपर्क या सर्व गोष्टी सांभाळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याच्यासोबत छगन प्रीतम चरपे, सचिन भागवत झोड, सुरज सुपटकर आणि विशाल देविदास शेंबेकर अशी पाच जणांची टोळी कार्यरत होती.

छापा आणि मोठी कारवाई

मंगळवारी दुपारी अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली की समीरने काटोल शहरातील वार्ड क्र. ७ मधील चांडक लेआउट येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला आहे.

त्या माहितीवरून पथकाने काटोल पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा मारला. छाप्यात तीघांना घटनास्थळीच अटक करण्यात आली आणि अंदाजे 34 किलो गांजा ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर एका मालवाहू वाहनासह काही महत्त्वाचे साहित्यही जप्त करण्यात आले.

ओडिशातून मागवला होता 100 किलो गांजा

तपासात आणखी एक गंभीर माहिती समोर आली आहे. या टोळीने ओडिशातील तस्करांकडून तब्बल 100 किलो गांजा मागवला होता. त्यापैकी 65 किलो गांजा विविध ग्राहक आणि एजंटकडे पोहोचवण्यात आला होता. उर्वरित माल काटोलमधील खोलीत लपवून ठेवण्यात आला होता.

पोलिसांनी या खोलीत साठवलेला उर्वरित माल जप्त करताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तपास अधिकारी सांगतात की या टोळीचे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क होते आणि ही टोळी मोठ्या प्रमाणात गांजा पुरवठा करत होती

सखोल तपास सुरू

सध्या पोलिसांनी सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. ओडिशातील पुरवठादार, स्थानिक एजंट, राजकीय संपर्क आणि आर्थिक व्यवहार या सर्व दिशांनी तपास सुरू आहे.

या प्रकरणामुळे भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. पक्ष संघटनेवरही दबाव निर्माण झाला असून भविष्यातील कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात आणखी कोणी गुंतले आहे काय? कोणत्या मार्गाने माल येत होता? हा पैसा कुठे वापरला जात होता? याबाबतही तपास वाढवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT