नागपुरात नवरात्र उत्सवात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. File Photo
नागपूर

नागपुरातील सर्व विधानसभा जागांवर भाजपची लढण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र उट्टलवार

नागपूर: उपराजधानीत एकीकडे नवरात्रोत्सवाची धुमधाम, रास गरबा, धमाल दांडिया सुरू असतानाच भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने नवरात्र उत्सवात महाजनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. लोकसभा निवणुकीत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी विजयी झाले असले तरी त्यांचे मताधिक्य कमी झाले. (BJP Nagpur)

शहरातील 458 बूथ बी ग्रेड मध्ये आहेत, ही चिंतेची बाब लक्षात घेता त्यांना ए किंवा ए प्लस करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. शहरातील 32 हजारांवर कार्यकर्ते शहरात घरोघरी जातील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक मान्यवर या निमित्ताने अभियानात सहभागी होणार आहेत. (BJP Nagpur)

शहर भाजपचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या नागपूर येथील बैठकीतील सूचनेनुसार रविवारी (दि.६) नागपुरात सकाळीं 8 ते 11 दरम्यान महाजनसंपर्क अभियान राबविले जाईल. मतटक्का वाढावा, प्रत्येकाने मतदान अधिकाराचा वापर करावा, हा संदेश देणे हा मूळ उद्देश आहे.

पूर्व आणि मध्य नागपुरात बूथवर नितिन गडकरी स्वतः संपर्क करतील. दक्षिण, दक्षिण पश्चिम मतदार संघात उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ज्येष्ठ नेते मंत्री कैलास विजयवर्गीय पश्र्चिम नागपूर भागात जनसंपर्क साधतील. संघटनात्मक दृष्टीने मंडळ अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी आणि आमदार यावर मॉनिटरिंग करतील. विशेष म्हणजे हायटेक प्रणाली, बूथ चलो अभियानातून 13 लाख जनतेचे मोबाईल क्रमांक भाजपकडे आहेत.

प्रत्येक बूथवर 31 घरांची समिती असून 5-5 घरांची जबादारी कार्यकर्त्यांवर आहे. अर्थातच लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने हा प्रचाराचा श्रीगणेशा समजू शकता. पण आम्ही बाराही महिने जनतेच्या संपर्कात असतो. नागपुरच्या सर्व सहाही मतदार संघात भाजपचे उमेदवार असतील, असे बंटी कुकडे यांनी स्पष्ट केले. यामुळे महायुतीत नागपुरात यावेळी जागा हवीच अशा पवित्र्यात असलेल्या शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांचा पुन्हा एकदा हिरमोड होणार, असे दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT