BJP announces 58 new district presidents
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीपूर्वी संघटन बळकट करण्यासाठी भाजपकडून राज्यातील 58 जिल्हा, शहर अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात प्रथमच शिवसेनेप्रमाणे दोन अध्यक्ष देण्यात आले आहेत. यात काटोल विभागासाठी मनोहर कुंभारे तर रामटेकसाठी आनंदराव राऊत यांची निवड झाली आहे.
नागपूर शहरासाठी महानगर अध्यक्ष म्हणून माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रस्थापिताना धक्का देत नव्या व्यक्तींना संधी दिली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार प्रमुख विभागांतील एकूण ५८ जिल्ह्यांमध्ये ही नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.
या नव्या नेतृत्वामार्फत पक्षाचे गावपातळीवरील संघटन अधिक बळकट करण्याचा आणि आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षकार्याला अधिक मजबुती देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.