नागपूर - नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे सरकारच्यावतीने ताब्यात घेतली गेली आहे. आम्ही ती महाराष्ट्रात घेऊन येणार आहोत. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला पाहण्यासाठी ती उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सोमवारी स्पष्ट केले. राजे मुधोजी भोसले यांनी याविषयीचा आनंद व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव जिंकण्यापासून ते ती ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि भूमिका असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, लंडन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार शेलार यांनी मानले आहेत.
रघुजी राजे भोसले यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही तलवार राज्याच्या सांस्कृतिक ठेव्यामधील आणखी एक मोलाची भर मानली जात आहे. वाघनख्यांनंतर महाराष्ट्राच्या तिजोरीत दाखल होणारा हा दुर्मीळ वारसा ऐतिहासिक अभिमानाशी जोडलेला क्षण असल्याची भावना सरकारकडून व्यक्त करण्यात आली. तलवारीचे मुंबईत भव्य स्वागत करण्याची तयारी सुरू असून 18 ऑगस्ट रोजी ती भारतात येणार आहे.