Bachchu Kadu warning CM residence march
नागपूर : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, दिव्यांगाना महिना 6 हजार अशा विविध मागण्यांसाठी नागपुरात धडकलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू शेतकरी प्रश्नी अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. आपण सायंकाळपर्यंत वाट पाहू, नंतर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी रामगिरीकडे शेतकऱ्यांसोबत आगेकूच करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अजून आवाहन केले नाही. वेळप्रसंगी उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतो. बैठकांची गरज नाही, निर्णय करा, असे आवाहन केले. प्रसंगी गावागावात चक्काजाम करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिल्याने पावसाळी वातावरणात नागपुरात वातावरण तापले आहे. रामगिरीभोवती सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आज राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला शेतकरी नेते गेले नाहीत. सरकारचा आम्हाला अटकेचा डाव होता, असा आरोप केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली याआधीही राज्य हलवणारी आंदोलने झाली आहेत.
यात रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस अन्नत्याग, लोकप्रतिनिधींच्या घरावर टेंबा आंदोलन, मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग, डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पवित्र भूमीतून पापड ते चिलगव्हाण पायदळ वारी, आणि महाराष्ट्रभर ४,९०० किमीची शेतकरी हक्क यात्रा लक्षवेधी ठरली.
या आंदोलनाचा बेलोरा ते नागपूर असा १८२ किलोमीटरचा प्रवास असून अडगाव, यावली शहीद, डवरगाव फाटा, वर्धा, पवनार, सेलू, केळझर, खडकी आणि शेवटी बुटीबोरी असा हा प्रवास आहे. यावेळी राज्यातील सर्व प्रमुख शेतकरी नेते एकत्रित मंचावर दिसणार आहेत. यात शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी आमदार अॅड. वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), राजू शेट्टी (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना), महादेव जानकर (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ. अजित नवले (अखिल भारतीय किसान सभा), बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष), राजन क्षीरसागर (अखिल भारतीय किसान सभा - प्रगत मंच), प्रकाश पोहरे (अध्यक्ष, किसान ब्रिगेड), दीपक केदार ( ऑल इंडिया पँथर सेना), प्रशांत डिक्कर (स्वराज्य पक्ष), विठ्ठलराजे पवार ( शरद जोशी विचार मंच, शेतकरी संघटना) यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.