Soybean Government Purchase Centers
नागपूर : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाचे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे, शेतकऱ्याला नाइलाजाने आपला माल खासगी व्यापाऱ्यांकडे हमीभावापेक्षा (MSP) खूपच कमी दराने विकावा लागत आहे. यामुळे राज्य सरकारने शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
सोयाबीन काढणी पूर्ण होत आहे. परंतु खरेदी केंद्रांबाबत शासनाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत, तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. या दिरंगाईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, खासगी बाजारात सोयाबीनला केवळ 3000 ते 3300 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटलमागे जवळपास 2000 रुपयांचे थेट नुकसान सहन करावे लागत आहे.
खरीप हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची तातडीची गरज आहे. परिणामी, ते मिळेल त्या भावाने सोयाबीन विकण्यास मजबूर आहेत. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः आर्थिक लूट होत आहे. अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आता सरकारी अनास्थेचा फटका बसत असल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.