Akhand Ghungroo Naad 2025  
नागपूर

देशभरातील कलाकारांची मांदियाळी! नागपुरात सलग 12 तास चालला शास्त्रीय नृत्याचा 'अखंड घुंगरू नाद'

रविवारी सकाळी ठीक सात वाजता सुरू झालेला 'घुंगरू नाद' सलग १२ तास वाजत राहिला आणि रसिकांनी एका अद्भुत सांस्कृतिक सोहळ्याची अनुभूती घेतली.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: रविवारी सकाळी ठीक सात वाजता सुरू झालेला 'घुंगरू नाद' सलग १२ तास वाजत राहिला आणि रसिकांनी एका अद्भुत सांस्कृतिक सोहळ्याची अनुभूती घेतली. भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, कुचीपुडी, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम आणि सत्रिया अशा आठही शास्त्रीय नृत्य प्रकारातील नर्तकांच्या पायातील घुंगरू न थांबता वाजत राहिले.

धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे 'अखंड घुंगरू नाद 2025' या 12 तासांच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खरे टाऊन येथील रजत महोत्सव बिल्डिंग, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर येथे हा उपक्रम झाला आणि हे या 'अखंड घुंगरू नाद' उपक्रमाचे चौथे वर्ष होते.

धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, सचिव सुरेश देव, सामाजिक कार्यकर्ती अरुणा पुरोहित आणि नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, नटराज पूजन आणि मंगलध्वनीने या उपक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला.

या महायज्ञात अवंती काटे आणि पूजा हिरवडे यांनी 'अखंड घुंगरू नाद'च्या थीम सॉंगवर पहिली नृत्याहुती दिली. त्यानंतर देशभरातील एकूण ४३ संस्थांमधील २२० कलाकारांनी सहभाग घेतला. या कलाकारांनी एकामागोमाग एक, प्रत्येकी दहा मिनिटांचे ७८ नृत्याचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, सादरीकरणाच्या मधल्या अवकाशकाळातही फिलर म्हणून घुंगरू नाद सुरूच राहिला. संपूर्ण १२ तासांच्या कार्यक्रमाचे तीन-तीन तासांचे चार टप्पे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपाला आठही नृत्य प्रकारांतील कलाकारांनी थीम सॉंगवर एकत्रित नृत्य सादर केले.

या उपक्रमात नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर तसेच केरळ, मणिपूर आणि झांसी येथील कलाकारांनी सहभाग नोंदवला. डॉ. रविंद्र हरिदास, डॉ. सदानंद चौधरी, संयोजक अवंती काटे, पूजा हिरवडे, मौक्तिक काटे, अक्षय तिजारे, पल्लवी पारसकर, नेहा माळवे, तुषार राऊत, विलास महाजन आणि हर्षल बारापात्रे यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.

मान्यवर गुरूंची नृत्यांजली

या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर गुरू आणि नर्तकांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांची विशेष नृत्यांजली झाली. यामध्ये मणिपूरहून आलेले मणिपुरी गुरू चानुलिमा, सरिता देवी, रोनिता, कलामंडलम केरळचे अखिल वर्मा, अमरावतीहून आलेले ओडिसी गुरू मोहन बोडे, नागपूरच्या कथ्थक गुरू श्रीमती ललिता हरदास, भरतनाट्यमच्या श्रीमती माडखोलकर आणि सत्रिया नृत्यांगना तन्विर कौर यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT