नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. स्थानिक युनिटशी आम्ही विचार करू, उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलले तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, जिथे जिथे शक्य असेल, तिथे तिथे महायुती म्हणून समोर जाऊ, असे भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डाओस दौऱ्याबाबत टीका करीत असल्याबाबत बावनकुळे म्हणाले, विरोधकांना टीका करण्याचेच काम आहे. अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्र मजबूत केला नाही. मला माहित आहे की, मुख्यमंत्री दाओसला जात आहेत. तर महाराष्ट्र हा राज्यातील सर्वाधिक गुंतवणूक आणणारे राज्य ठरणार असल्याचा दावा केला.
स्वामित्व योजनेच्या शुभारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पंधरा हजार गावांमध्ये आजपासून स्वामित्व योजनेचे कार्ड वाटप सुरू झाले आहे. स्वामित्व योजनेतून गावठाण, वाड्यापाड्या, धनगरवाड्यांना आणि आदिवासींना घराचे स्वामित्व मिळणार आहे. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. स्वामित्व कार्डच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे यावर भर दिला.
दहावी बारावी ऍडमिट कार्डवर जातीचा उल्लेख संदर्भात बोलताना लिव्हिंग सर्टिफिकेट वर आधीच जातीचा उल्लेख असतो असे सांगितले. पारधी जात प्रमाणपत्र बाबत छेडले असता विभागीय आयुक्तांकडे बैठक लावून पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मेळघाट जादूटोणा विषयक घटनेबाबत छेडले असता मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी आज भेटणार आहे. याप्रकरणी चर्चा करणार असून तातडीने यामध्ये सरकारने कारवाई केली आहे. पुन्हा अशा घटना होऊ नयेत, यासाठी सरकार काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.