Life Ended News 
नागपूर

Nagpur Crime: NDAच्या स्वप्नाचा भंग; वाढदिवसाच्या दिवशीच १८ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेने परिसरासह सुजनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नॅशनल डिफेन्स अकादमीच्या (NDA) परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने आलेल्या तणावातून १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुजन गजानन बाजारे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, ही घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचभुवन परिसरातील 'मूर्ती हाऊसिंग सोसायटी'मध्ये घडली.

सुजनने कोल्हापूर येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तो नागपुरात परतला आणि एनडीएच्या परीक्षेची तयारी करत होता. मार्च महिन्यात त्याने एनडीएची परीक्षा दिली होती, मात्र त्यात कमी गुण मिळाल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होता. शुक्रवारी रात्री जेवण आटोपून तो आपल्या खोलीत झोपायला गेला. दरम्यान, त्याने लोखंडी हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. शनिवारी सकाळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली. नातेवाईकांनी त्याला तातडीने एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

वाढदिवशीच काळाचा घाला

शनिवारी सुजनचा वाढदिवस होता. ज्या दिवशी आनंदाचे वातावरण असायला हवे होते, त्याच दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरासह सुजनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुजनचे वडील व्यावसायिक असून, मागे त्याचे आई आणि दहा वर्षांचा धाकटा भाऊ असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT