Nagpur Husband Wife Accident Video
नागपूर : एक व्यक्ती मोटरसायकलवरून मृतदेह घेऊन जात असल्याचा एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यातील व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचा मृतदेह मोटरसायकलला पाठीमागे बांधून नेत असल्याचे दिसते. महामार्ग पोलिसांनी हा व्हिडिओ काढला असून तो व्हायरल झाला आहे. मन सुन्न करणारी ही घटना नागपूरमधील आहे.
यातील व्यक्ती हेल्मेट घालून मोटरसायकल चालवत असून त्याने पाठीमागे पत्नीचा मृतेदह बांधला असल्याचे दिसते. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी अपघाताची घटना घडली. सदर व्यक्तीच्या पत्नीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याने ये-जा करणाऱ्या लोकांकडे मदत मागितली. पण त्याच्या मदतीसाठी कोणतेही वाहन थांबले नाही. शेवटी त्याने पत्नीचा मृतदेह मोटरसायकलला बांधून मध्य प्रदेशातील त्याच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला.
मृत महिला ३२ वर्षांची होती. तिचे नाव ग्यारसी अमित यादव असे आहे. देवलापर पोलीस स्थानक हद्दीत मोरफाटा परिसरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. त्यात ग्यारसीचा जागीच मृत्यू झाला. हे दाम्पत्य मूळचे मध्य प्रदेशातील सिवनी येथील राहणार आहे. ते गेल्या १० वर्षांपासून नागपूरजवळील लोणारा येथे वास्तव्यास होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी हे दाम्पत्य लोणारा येथून करणपूरला जात होते. या दरम्यान अपघात झाला. अमितने अपघातानंतर अनेकवेळा रस्त्याने जाणाऱ्या वाहनांकडे मदत मागितली. पण कोणीही त्याच्या मदतीसाठी थांबले नाही. शेवटी हताश झालेल्या अमितने पत्नीचा मृतदेह मोटरसायकलला मागे बांधला आणि तो त्याच्या घरी जाऊ लागला. यादरम्यान, महामार्ग पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही थांबला नाही. त्यानंतर, पोलिसांनी त्याला थांबवून मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविचिकित्सेसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.