नागपूर, पुढारी वृत्तसेवा : निधी वाटपाच्या बाबतीत या सरकारवर आमचा कुठलाही आरोप नाही. या सरकारमध्ये इतिहासात कधी मिळाला नाही, इतका निधी माझ्या मतदारसंघाला मिळाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अर्थमंत्री म्हणून धोरणावर कधीकाळी नाराज असलेले आमदार आता ना मंत्रिपद ना निधी बाबत नाराज आहेत. सारे काही 'फिल गुड' असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा जोरात आहे. राज्य खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष असताना मंत्रिपदाची आशा असलेले आमदार आशिष जैस्वाल यांनी आज (दि.२) माध्यमांशी संवाद साधला.
आशिष जयस्वाल म्हणाले, या सरकारमध्ये परिपक्व आणि अभ्यासू नेते नेतृत्व करतात. त्यामुळे काही अडचणी नाहीत. महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत. आमचे परस्पर कॉर्डिनेशन चांगले आहे. माझे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत जुने संबंध आहेत. त्यामुळे निधी वाटपाची काही अडचण नाही. दरम्यान, प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा हक्क आहे, किंबहुना ते त्यांचे कर्तव्य आहे. आता आम्ही आपल्या मतदारसंघात रमलो आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही मला माहित नाही. मी फक्त आमदार असूनही राज्यातील अनेक धोरणांवर काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. मी समाधानी आहे. माझ्या अभ्यासाचा वापर करून पुरेपूर संधी दिली जात असल्याने मी आनंदी आहे, असा दावा जैस्वाल यांनी केला.
केवळ अधिवेशनातचं प्रश्न मिटतात असं नाही, अधिवेशन एक माध्यम आहे. सरकारमार्फत कॅबिनेटमध्ये वेगवेगळे निर्णय घेऊन अनेक समस्या सोडविल्या जातात.निधीच्या बाबतीत ज्या बातम्या आल्या, त्या चुकीच्या आहेत. त्या बातम्यांना काही आधार नाही, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. कडू म्हणाले, निधी वाटप बऱ्यापैकी झाले आहे. जे सत्तेत आहेत, त्यांना निधी भेटेलच. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना निधी कसा भेटेल असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला.