विदर्भ

नागपूर: भरधाव गाडी घरात घुसून मुलाचा मृत्यू

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: भरधाव गाडी रस्त्यालगत असलेल्या एका घरात घुसल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीव्ही टॉवर परिसरात ही घटना घडली. जॉर्डन उर्फ विकी फिलिप जोसेफ (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टीव्ही टॉवरकडून आयबीएम रोडवरून गाडी (एमएच 26 ए एफ 0226) भरधाव निघाली होती. या गाडीमध्ये ४ ते ५ युवक होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट घरात घुसल्याने घराची भिंत पडली. जॉर्डन या भिंतीखाली दबला. गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्य़ात आले. परंतु रात्री उशिरा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जॉर्डन उर्फ विकी आजीकडे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. त्याच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. संतप्त नागरिकांनी गाडीमधील तरुणांना मारहाण केली. या अपघातात गाडीमधील तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याठिकाणी यापूर्वी देखील अशा अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. जड वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यासाठी महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे संतप्त नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT