नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील कॅश काउंटर आता 'कॅशलेस' होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या वेळेत बचत होणार असून रोकड सोबत बाळगण्याची गरज नाही.
विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास होत असलेली असुविधा लक्षात घेता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीष पालीवाल यांनी ही ऑनलाईन शुल्क भरणा प्रणाली लागू केली आहे. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क त्याचप्रमाणे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इतर कोणतेही शुल्काचा भरणा पूर्वी रोखीने करावा लागत होता.
विद्यापीठ पदव्यूत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश तसेच इतर कोणतेही शुल्क आता ऑनलाईन भरता येणार आहे. विद्यापीठ पदव्यूत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरता यावे म्हणून rtmnu.unisuite.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांच्या ईमेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांना UPI/NEFT/RTGS/Debit Card/Credit Card इत्यादी मार्फत शुल्क भरता येणार आहे.