नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर विद्यापीठ ग्रंथालय परिसरातील कॅनॉल रोड रामदासपेठ येथील गेले अनेक महिने रखडलेल्या पुलाच्या प्रश्नावर आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपच्या पश्चिम नागपूर विभागातर्फे आज (दि.१३) रामदासपेठ येथे निदर्शने केली. महिनाभरात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका रस्त्यावर रास्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
आपचे पश्चिम नागपूरचे संयोजक अभिजीत झा यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जगजित सिंग, शहर संयोजक कविता सिंघल, संघटन मंत्री शंकर इंगोले, महेश बावनकुळे, जावेद अहमद, जॉय बांगड़कर, सचिन लोनकर, मोहशीन खान, संदीप कोवे, आकाश वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.
8 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामदासपेठ येथील नाल्यावरील पुलाची सुरक्षा भिंत वाहून गेली. त्यानंतर महानगरपालिकेकडून हा संपूर्ण पूल पाडण्यात आला. दरम्यानच्या काळात नव्याने पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तब्बल 8 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार आहे. भाजपचे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांचे पुत्र सिद्धार्थ व भाऊ अनिल मेंढे यांच्या सनी इन्फ्राप्रोजेक्ट प्रायवेट लिमीटेड या कंपनीला महापालिकेने पूलाच्या बांधकामाचे कंत्राट दिले. ऑक्टोबरमध्ये यासंबंधीचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही.
प्रत्यक्षात 18 महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असताना कंत्राटदाराचे काम कासवगतीने सुरु आहे. पुलाच्या बांधकामामुळे रामदासपेठकडून महाराजबागकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. गेल्या 7 महिन्यांपासून हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, हा पुल नेमका कशामुळे खचला, याबद्दल महानगरपालिकेने कुठलीही चौकशी न करता दोषींना पाठीशी घातल्याचा आपने केला आहे. नाल्यावरील सुरक्षा भिंत पडली असताना इतर आवश्यक उपाययोजना न करता सरसकट पूल पाडण्याचे कारण काय ? हा पूल पाडण्यापूर्वी महानगरपालिकेने तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या होत्या का ? असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, त्याबद्दल महापालिका आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे.
हेही वाचा