विदर्भ

नागपूर :  निखिल मेश्राम हत्या प्रकरणी ७ आरोपींना जन्मठेप, ५ निर्दोष

सोनाली जाधव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  नागपूरमध्‍ये २०१८ साली घडलेल्या निखिल मेश्राम हत्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.  शांतीनगर पोलिस हद्दीत कावरापेठ परिसरात प्रेमप्रकरणातून ही घटना घडली होती. या प्रकरणातील गीता राठोड, माया सोलंकी, राजुरी परमार, धनश्री सोलंकी या आरोपी महिला साडेचार वर्षांपासून फरार आहेत.

आरोपींवर मुलीच्या प्रियकराचा भाऊ निखिल मेश्राम याची हत्या केल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. जन्मठेप ठोठावण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामसुमेर बाबानगर येथील रहिवासी शंकर नथ्युलाल सोलंकी (वय ४२), देवीलाल ऊर्फ देवा नथ्युलाल सोलंकी (वय २८), सुरज चेतन राठोड (वय २०), रमेश नथ्युलाल सोलंकी (वय ३६), यश ऊर्फ गुड्डू हरीश लाखानी (वय १९), मिख्खन नथ्युलाल सालाद (वय १९), मीना नथ्युलाल सालाद (वय ३५) यांचा समावेश आहे.

डोळ्यात चटणी फेकून मारहाण

 किरण ऊर्फ विक्की मेश्राम यांचे आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यावरुन दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. घटनेच्या आदल्या दिवशी किरण मेश्राम व त्याच्या आईला आरोपींनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी  किरण व त्‍याच्‍या आईवर दबाव टाकला. मात्र, किरण व निखिल या दोघांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिला होता. २० मे २०१८ रोजी आरोपींनी किरण व निखिलच्या डोळ्यात तिखट फेकून त्यांच्यावर लाठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. या हल्‍ल्‍यात पाच आरोपीही जखमी झाले होते.

तक्रारदाराने २४ आरोपींविरुद्ध शांतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने १७ जणांची साक्ष नोंदविण्यात आली.  ७ आरोपींना दोषी ठरवत न्‍यायालयाने जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली. तर पाच आरोपींची मुक्तता केली. २४ आरोपींमध्ये ८ विधीसंघर्ष (अल्पवयीन) बालकांचा समावेश होता. यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT