विदर्भ

चंद्रपूर : ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा उपक्रम’ चांगलाच गाजला

मोहन कारंडे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : 'समस्या तुमच्या पुढाकार आमचा' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी बुधवारी २४ मे रोजी जि. प. च्या कन्नमवार सभागृहात आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. प्रलंबित समस्यांची समाधानकारक माहिती न दिल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आमदार अडबाले यांनी चांगलेच धारेवर धरले. सभेत चुकीची माहिती दिल्यानंतर आमदारांनी आक्षेप घेताच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माफीही मागितली. या माध्यमातून माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील जवळपास २५ सामूहिक व अनेक प्रलंबित असलेल्या वैयक्तिक समस्या चर्चेत आल्या. माध्यमिक विभागातील समस्यांची उत्तरे देताना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची चांगलीच दमछाक झाली. अनेक समस्यांचे समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे बैठकीत वातावरण तापले. २४ मे रोजी समस्यांवर बैठकीचे आयोजन असताना कार्यालयातील काही जबाबदार अधिकाऱ्यांना सुट्टी मंजूर केल्याबद्दलचा मुद्दाही ऐरणीवर आला. त्यात शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. प्रलंबित समस्यांचे स्पष्टीकरण देताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना चांगलाच घाम फुटला. या सभेमध्ये अधिकारी व समस्याग्रस्त कर्मचारी आमने सामने आल्यामुळे आमदारांसमोर अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. सभेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची समाधानकारक कुठलीही पूर्वतयारी नसल्यामुळे शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. अनेक शासकीय आकडेवारी देखील त्या सांगू शकल्या नाहीत.

ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली. सायंकाळी साडेसहा पर्यंन्त सुरूच होती. प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कर्मचारी व संघटनांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे  आभार मानले. जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित सामुहिक व वैयक्तिक प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व याच विषयांवर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घ्यावी, असे निर्देश आमदार अडबाले यांनी शिक्षक विभागास दिले. प्राथमिक शिक्षण विभागातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती करण्याबाबत चर्चा करणे, चटोपाद्याय वेतनश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी चालू ठेवणे व भविष्यात अतिप्रदान वसुली न करणे, सन 2022-23 प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करणे, प्राथमिक शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शाळेत पदस्थापना देणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा व तिसरा हप्ता अदा करणे, सन २०२२-२०२३ चे शाळांना सादिल खर्चाबाबत माहिती देण्यासह विविध समस्यांवर चर्चा झाली.

यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाकर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी देशमुख, निकिता ठाकरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, जगदीश जुनघरी यांच्यासह शिक्षक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, समस्याग्रस्त, शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT