विदर्भ

निलंबनानंतर आमदार आशिष देशमुखांचे पक्षाच्या नोटीसला उत्तर

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी पक्षाने बजावलेल्या नोटीसला विहित मुदतीत उत्तर दिले आहे. "भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के ओबीसी आहेत, या वास्तवावर माझी ही सूचना आधारित आहे. काँग्रेस हा नेहमीच ओबीसींचा पाठिंबा मिळत आलेला पक्ष आहे. हा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काय? मी राहुल गांधींना तसे करण्यास सुचवले तर त्यात वावगे काय? असे देशमुख यांनी नमूद केले आहे. असा मी काय गुन्हा केला? हा विषय संपवायला हवा असे मला वाटले म्हणून मी सूचना केली. पक्षाला बळकट करण्यासाठी ओबीसींना पुन्हा मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबत आणले पाहिजे," असे मत मांडून देशमुख यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

देशमुख यांनी सडेतोड भाषेत उत्तर दिले आहे. राहुलजींच्या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, जणू त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आपण या अर्थाशी सहमत आहोत की नाही, हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. माझी सूचना पक्षाच्या हिताची होती. मला एवढंच म्हणायचे होते की, ओबीसी समाजात काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल तर माफी मागून प्रकरण संपवले पाहिजे. "चौकीदार चोर हैं' प्रकरणी राहुल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. राफेल प्रकरणातही त्यांनी मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

काँग्रेस 'लोकतांत्रिक पार्टी' असल्याचा अभिमान बाळगणारा पक्ष आहे आणि त्याचे नेते लोकशाही पध्दतीने केलेल्या सूचनेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावतात हा एक मोठा विनोद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही काँग्रेसचे असंख्य ओबीसी नेते आहेत. माझा प्रश्न असा आहे, की ते ओबीसींसाठी काय करत आहेत? ते समाजाची नाराजी कमी करण्यासाठी किंवा त्यांचा योग्य वाटा त्यांना देण्यासाठी काय करत आहेत? दुर्दैवाने काहीच नाही. पक्ष एका नाजूक टप्प्यातून जात असताना, ते अद्याप पक्षांतर्गत गटबाजीत आनंद मानत आहेत. ते घराणेशाही कार्यशैलीने काँग्रेसला कमकुवत करत आहेत. त्यांचे प्रदीर्घ मौन आणि निष्क्रियता त्यांच्या अधूनमधून येणाऱ्या वक्तव्यांपेक्षा आणि कारणे दाखवा नोटीससारख्या कृतींपेक्षा जास्त बोलकी आहे.

'खोका'वर स्पष्टीकरणाची गरज नाही

एमपीसीसी अध्यक्षांशी संबंधित 'खोका' या माझ्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तथापि, त्याचा अर्थ काढण्याचे काम मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांवर सोडतो. त्यांनी माझ्या सूचनेचा ज्याप्रमाणे अर्थ काढला, तसा ते या मुद्याचाही काढू शकतात. कारणे दाखवा नोटीस बजावण्यापेक्षा मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला देतो की, त्यांनी आपले मन, शब्द आणि कृती ओबीसींच्या हितासाठी वापरावी ज्यामुळे आपोआप पक्षाचे हित होईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT