Reduction in the number of Saras Bird
गोंदिया येथे पाणवठ्यावर असलेले सारस पक्षी Representive Photo
गोंदिया

धक्कादायक! सारस पक्षांच्या संख्येत घट

करण शिंदे

प्रमोदकुमार नागनाथे

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : रखरखत्या उन्हाचा मानवासह पशुपक्ष्यांनाही फटका बसत आहे. दरम्यान आर्द्रा नक्षत्राचे दोन दिवस लोटूनही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अधिकांश पानवठे, गाव व शेत शिवारातील तलाव कोरडे पडू लागले आहे. परिणामी पशु-पक्ष्यांवर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, वन विभाग आणि सेवा संस्थांकडून यंदाच्या सारस पक्ष्यांच्या प्रगणनेला रविवार (ता.29) सुरुवात करण्यात आली असून पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धतीने ही गणना करण्यात येत आहे. असे असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात आढळून येणाऱ्या सारस पक्ष्यांनाही उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षी सारस पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे. विशेषतः गेल्या वर्षी 29 सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती, त्या तुलनेत यंदा 23 ते 25 सारस आढळून आले आहे.

दुर्मीळ सारस पक्ष्याच्या अधिवासासाठी राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. या सारस पक्ष्यांना पाहण्यासाठी राज्यासह शेजारच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील पर्यटकही जिल्ह्यात हजेरी लावतात. विशेषतः गोंदिया तालुक्याच्या काही भागात दुर्मीळ सारस पक्ष्यांचे वास्तव्य आहे. सारस पक्षी दुर्मिळ असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक गोंदिया तालुक्यात येतात. शासन प्रशासनाकडून सारस पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न केले जात असले तरी हे प्रयत्न कुठेतरी कमी होत आहेत.

विशेष म्हणजे, सारस पक्ष्यांचा अधिवास शेती परिसरात किंवा पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी असते. मात्र, यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेत तलाव व पानवठे आदी स्त्रोत कोरडे ठाक पडले आहे. अशा परिस्थितीत उष्णतेचा फटका सारस पक्ष्यांनाही सोसावा लागत असल्याचे चित्र असून आता सारस पक्ष्यांवरही पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकंती करण्याची वेळ आली असल्याचे दिसू लागले आहे.

सारस गणनेची आकडेवारी होणार प्रसिध्द

गोंदिया जिल्ह्यासह भंडारा जिल्हा व शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात सीमावर्ती भागात सारस पक्ष्यांचे अधिवास दिसून येते. त्यानुसार दरवर्षी या तिन्ही जिल्ह्यात सारस गणना करण्यात येते. या अनुषंगाने 23 व 24 जून रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. यात आतापर्यंत 22 ते 25 सारस आढळून आले आहे. तर मंगळवारी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारस गणना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील आणखी काही दिवस गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ठराविक ठिकाणी सारस गणना करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांची आकडेवारी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

विदर्भात सर्वाधिक सारस गोंदिया जिल्ह्यात असल्याची नोंद आहे. सारस पक्ष्यांचे अधिवास धान शेतीसह तलाव परिसरात राहते. मात्र, आजघडीला अधिवास असलेल्या परिसरातील शेतात पाण्याचा थेंब नसताना अनेक तलावही कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे सारस पक्ष्यांना तहान भागविण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत येत्या काळात पाण्याची उपलब्धता करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

उष्णतेचा प्रभाव पक्ष्यांवर होऊ शकतो, हवामान बदल झाला की त्यांच्यामध्येही बदल येतात. मात्र, त्यांच्या संख्येत घट होण्यामागे हे एकच कारण नसून इतरही कारणे आहेत. जसे शेतात कीटकनाशकांचे वाढते प्रमाण, विद्युत प्रवाह, शेतीत झालेला बदल, सिंचन व्यवस्था एकंदरीत दिवसेंदिवस वातावरणात बदल होत असून अनुकूल वातावरण निर्मिती होत नसल्याचे दिसून येत आहे.
सावन बहेकार, पर्यावरण मित्र तथा अध्यक्ष सेवा संस्था, गोंदिया
SCROLL FOR NEXT