गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून २० लाख रुपयांची घरफोडी करणार्या अट्टल चोरट्यास आज (दि.२२) गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. व त्याच्याकडून १५ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साहील उर्फ माट्या राजू आंबेकर (रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
शहरातील सिव्हील लाईन परिसरातील जाफर कंडूरेवाला हे ९ मार्चला बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. व तिजोरीतील ५५ तोळे सोने, टॅब व रोख रक्कम असा एकूण २० लाख ७४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी जाफर कंडूरेवाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्ष्यात घेऊन या गुन्ह्यातील चोरट्याचा तात्काळ शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोंदिया शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून याप्रकरणी तपास सुरू केला. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे ही घऱफोडी अट्टल चोरटा आरोपी साहील उर्फ माट्या राजू याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. साहील याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चंद्रपूर येथील त्याच्या घराची झाडाझडती घेतली व चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १५ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.
अटक करण्यात आलेला आरोपी साहील उर्फ माट्या राजू हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा- ४, रामनगर – ८, राजुरा – २, चंद्रपूर शहर – ९ असे गुन्हे यासह वर्धा रेल्वे येथे एक खुनाचा गुन्हा व गोंदिया येथे घरफोडीचा गुन्हा अशा २५ गुन्ह्यांची नोंद आहे.
हेही वाचा :