आमदार विनोद अग्रवाल 
गोंदिया

ना पक्ष प्रवेश, ना घर वापसी मी भाजपचाच : आमदार विनोद अग्रवाल

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. पण मी गेली पाच वर्षे भाजप सोडून कुठल्याही पक्षात गेलो नाही. तेव्हा मी पक्ष प्रवेश किंवा घरवापसी असे शब्द वापरणार नाही. मी भाजपचा होतो आणि भाजपमध्येच राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आज (दि.७) पत्रकार परिषदेतून दिली. तर सर्व समाज वर्गाची प्रगती व्हावी, हीच माझी तत्वे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पुर्वी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबन मागे घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. परिणय फुके, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष एड. येसुलाल उपराडे, आमदार विजय रहांगडाले, संगठन मंत्री विरेंद्र अंजनकर, माजी आमदार केशवराव मानकर, संजय पुराम, पं.स. सभापती मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव ऊके, छत्रपाल तुरकर, शिव शर्मा आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही संधीसाधू लोक सत्तेचा उपभोग घेण्यासाठी भाजपमध्ये आले. जे कधीही भाजपाचे झाले नाही, त्यांनी सत्तेच्या लालसेसाठी भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी व मुळ भाजपच्या रक्षणासाठी चाबी संघटनेच्या माध्यमातून संघटित झालो. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या संधीसाधूंच्या विरोधात संघर्ष केला व त्या संघर्षात गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेसह जिल्ह्यातील सर्वच वर्गाने मला साथ दिली.

समाजाच्या आशीर्वादाने तो संघर्ष निवडणुकीच्या रुपाने जिंकून लोकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली. त्यातच, ज्या संधीसाधूंनी पक्षात सामील होऊन सत्तेची सुखे उपभोगण्याची स्वप्ने पाहिली. त्यांना कार्यकर्त्यांनी घरी बसवले. ते पराभूत होऊन पक्षाला मागे ढकलत राहिले आणि शेवटी पक्ष सोडून इतर पक्षात गेले. मात्र, भाजपपासून दूर राहूनही मी कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. १९८५ पासून भाजपमध्ये काम करत असताना कठीण परिस्थितीत पक्षाला पुढे नेण्याचे काम आपण केले असून पक्षश्रेष्टींच्या निर्णयाचा नेहमी सन्मान केला आहे, असे सांगत 'मी कालही भाजपचाच होतो आजही भाजपमध्येच आहे व उद्यादेखील भाजपमध्येच राहणार' अशी स्पष्टोक्ती आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी दिली.

मी व माझे सर्व सहकारी आम्ही पुन्हा आमच्या प्रियजनांमध्ये आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. आज आमचे कुटुंब एकत्र आले असून खऱ्या अर्थाने आज विजय दिवस असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. त्यातच माझ्या या निर्णयाने माझे काही प्रियजण दुखावले असतील तर त्यांचीही आपण समजूत घालणार असून मी त्यांना खात्री देतो की, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा सिद्धांत आणि संकल्प आहे. मी माझ्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT