तीन वर्षानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला पीडितेला न्याय Pudhari File Photo
गोंदिया

अखेर न्याय झाला : अपंग गरोदर महिलेच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : ढासगड जंगल परिसरात एका अपंग गर्भवती महिलेचा कोयत्याने निर्घृण खून केल्याची घटना प्रकरणी तीन वर्षापूर्वी घडली होती. या घटनेप्रकरणी शनिवारी (दि.29) जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये मो. समीर अस्लाम शेख (वय 26 रा. बाजार वार्ड लाखनी, जि.भंडारा), आशिफ शेरखाँ पठाण (वय 38 रा. बाबा मस्तानी, जि. भंडारा), प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर (वय 25 रा. दुधा, नागपूर) अशी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ढासगड जंगलात एका 25 ते 30 वर्षीय अज्ञात अपंग गर्भवती महिलेचा धारदार हत्याराने गळा कापून खून केला होता. तीचा मृतदेह रोडपासून 25 फूट अंतरावर फेकून दिल्याची घटना 23 जुलै 2021 मध्ये उघडकीस आली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून चिचगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी मो. समीर अस्लाम शेख, आशिफ शेरखाँ पठाण आणि प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर यांना बुटीबोरी आणि भंडारा येथून अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात तपासी अधिकारी चिचगडचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी तपास पूर्ण करुन तिन्ही आरोपींच्या विरोधात न्यायालयात सबळ साक्ष पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, गोळा करून दोषारोप पत्र दाखल केले होते. दरम्यान, न्यायालयात खटला चालविण्यात आला होता. ज्यामध्ये खटल्याच्या युक्तिवादानंतर सबळ साक्ष पुराव्यावरून आरोपीतांविरुद्ध गुन्हा केल्याचे दोष सिद्ध झाला.

जिल्हा आणि सत्र न्यायालय गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी शनिवारी (दि.29) गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे न्यायालयीन कामकाज सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता गोंदिया जिल्हा यांनी काम पाहिले त्यांना ऍडव्होकेट प्रणिता कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सदर गुन्ह्याचे कोर्ट पैरवी कामकाज महिला नायक पोलीस शिपाई रिम्पी हुकरे यांनी कामकाज पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT