Sanjaynagar leopard attack 5 year old boy death
गोंदिया: संजयनगर येथील अंश प्रकाश मंडल (वय 5) हा सकाळी ५ च्या सुमारास घरच्या अंगणात लघुशंकेसाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामुळे गोठणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आला आहे. या प्रकरणी संजयनगर येथील संतप्त नागरिकांनी केशोरी-गोठणगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार व क्षेत्र सहायक शैलेंद्र भदाने यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. जो पर्यंत निलंबित करणार नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरु राहिल.
तसेच मृत बालकाचा मृतदेह वनविभागाच्या कार्यालयात घेऊन जाणार असुन कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. त्याचबरोबर संतप्त नागरिकांनी क्षेत्र सहायकाची चारचाकी सुद्धा फोडली आहे. आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, अशीच घटना मागील पंधरा दिवसांपूर्वी ईटियाडोह धरणावर घडली होती. आता वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे एका निरपराध बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे.