

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई शेतशिवारात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या मृतदेह (अंदाजे वय २५ ते३०) सोमवारी (दि. १०) सकाळी सहा वाजताच्या दरम्यान गावक-यांना आढळला. (Gondia Crime News)
गावकरी आपल्या शेतात रब्बी शेत कामाकरीता सकाळी सहाच्या सुमारास देऊटोला बबई शेतशिवारात गेले असता सदर अज्ञात महिलेचा मृतदेह जळत असल्याचे दिसुन आले. लगेच या घटनेची माहीती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी ताफ्यासह घटनास्थळी पोहचली. व घटनास्थळी पाहणी करून मृतदेहाचे पंचनामा केले. (Gondia Crime News)
अज्ञात महिलेच्या अंगावर तणस व त्यावर चादर टाकून पेटविण्यात आल्याचे दिसून आले. बाजुला असलेले तणसाचे ढीग जळालेल्या अवस्थेत दिसून आले. या अज्ञात महिलेला जाळून का मारण्यात आले, हे तपासानंतर समोर येणार आहे. घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहचले व मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.