गोंदिया : गोंदिया उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे भयानक रूप समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सदाशिव केसकर (वय ५३) यांच्या पुणे येथील निवासस्थानाची झडती घेतली असता, एसीबीला तिथे झडतीमध्ये केसकर यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा प्रचंड अधिक अशी ४ कोटी २५ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता उघडकीस आली आहे.
रोख रक्कम : ६ लाख ६६ हजार रुपये
दागिने : सोने आणि चांदीचे मौल्यवान दागिने.
मालमत्ता : स्थावर आणि जंगम स्वरूपाची कोट्यवधींची मालमत्ता.
गुरुवारी (४ डिसेंबर) एसीबीच्या पथकाने एआरटीओ राजेंद्र केसकर आणि रामनगर येथील राजेश रामनिवास माहेश्वरी (वय ५७) या दोघांना ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतरच केसकर यांच्या भ्रष्ट संपत्तीचा 'कुबेरी' खजिना उघड झाला.
नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एआरटीओ राजेंद्र केसकर आणि राजेश माहेश्वरी यांना गोंदिया येथील न्यायालयात हजर केले आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपास सुरू होता.