

गोंदिया : पुढारी वृत्तसेवा
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील लोहारा तिरखेडी येथे लग्नात नवरदेवाच्या बग्गीचे ब्रेक निकामी झाल्याने बग्गी खाली येऊन महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, लोहारा येथे मुकेश सहारे यांच्या दोन मुलींचे लग्न २० एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानी होते. त्यामुळे दोन्ही नवरदेव लोहारा या गावी आले होते. त्यात एक झांजिया व दुसरी तिरोडा गोंडमोहाडी येथील वरात नाचत गाजत नवरीच्या घरी जात होती. यावेळी रस्त्यावर एका महिलेचा पाय रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेल्याने ती महिला रस्त्यावर नवरदेवाच्या बग्गी समोर पडली. त्याच वेळी बगीचे ब्रेक न लागल्याने बग्गी सरळ त्या महिलेच्या अंगावरून गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. गोपीका भाऊलाल ढोमणे (वय 70 वर्षे), रा. गोंडमोहाडी, तिरोडा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दरम्यान या ठिकाणी दुसरी एक महिला गंभीर जखमी झाली. कांताबाई टिकाराम भंडारी, (वय अंदाजे 60 वर्षे), रा. घोटी (गोरेगांव), ता. गोरेगांव, जिल्हा गोंदिया हे आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.