गोंदियात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी परतली असून सोमवारी सकाळी तापमान घसरत 8.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचा जोर कमी झाल्याने पारा १५ अंशांपर्यंत वाढला होता आणि सामान्य जनजीवनही पूर्वपदी येऊ लागले होते. मात्र आता पुन्हा थंडीचा कहर सुरू झाला असून गोंदियात अक्षरशः हुडहुडी भरवत आहे.
दिवाळीनंतर काही दिवस हवेत उब जाणवत होती. लोकांना वाटत होतं की थंडीचा जोर यंदा कमीच राहील. पण अचानकच थंडीची धडक बसली आणि थंड वाऱ्यांनी तापमान झपाट्याने खाली आणलं. ९ नोव्हेंबरपासून थंडीने जोर पकडला आणि सलग काही दिवसांपासून पारा १० अंशांच्या आसपास फिरत होता. रविवारी तापमान ९.५ अंशांवर नोंदले गेले होते. तर सोमवारी त्यात आणखी घट होत 8.2 अंश सेल्सिअस इतके लक्षणीय कमी तापमान नोंदले गेले.
हवामान विभागाच्या नोंदी पाहिल्यास, गेल्या १० ते १५ दिवसांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांपेक्षा गोंदियातच सर्वाधिक थंडीची नोंद होत आहे. त्यामुळे गोंदियाने पुन्हा एकदा ‘विदर्भातील सर्वात थंड जिल्हा’ म्हणून आपली भूमिका कायम राखली आहे.
थंडी वाढल्याने नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वसनाचा त्रास अशा तक्रारीही मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्यांना त्रास वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत. सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका अधिक जाणवत असल्याने रस्ते तुलनेने ओस पडलेले दिसत आहेत.
शेतकऱ्यांसाठीही ही अचानक वाढती थंडी चिंतेचा विषय ठरत आहे. काही पिकांवर थंडीचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुकं आणि थंड वाऱ्यांमुळे भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता कृषी तज्ञ व्यक्त करत आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरणे, पाणी कोमट स्वरूपात पिणे आणि सकाळच्या कडाक्याच्या थंडीत बाहेर पडणे टाळण्याची सूचना देण्यात आली आहे.
गोंदियातील नागरिक मात्र सध्या पुन्हा एकदा गारठून गेले आहेत आणि हिवाळ्याने मारलेले हे ‘कमबॅक’ सर्वानाच जाणवत आहे.