गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सायकल चोरी करणार्या अट्टल चोरट्याला गोंदिया शहर डि.बी. पथकाने ताब्यात घेतले, असून त्याच्याकडून चोरीच्या ३१ हजार रुपये किमतींच्या ६ सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर सेलटॅक्स कॉलोनी फुलचुरटोलायेथील फिर्यादी प्रकाश रामलाल पुंडे, (वय ४१ ) यांच्या पुतणीने दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास नगर परिषद गोंदिया येथे आपली सायकल ठेवून शारदा वाचनालयात गेली असता दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तिची ६ हजार ५०० रुपये किमतीची सायकल चोरून नेल्याचे उघडकीस आले.
यावर ६ ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या तकारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात अप.क्र. ६२५/२४ क. ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच गोपनिय माहीतीच्या आधारे शहर पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी मंगेश जयलाल राऊत ( वय ३२, रा. सावित्रीबाई वार्ड कुंभारेनगर गोंदिया) यास जेरबंद करून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.
शहरातील वेगवेगळ्या परीसरातून वेगवेगळया कंपनीच्या ६ सायकली चोरी करुन पैकनटोली गोंदिया येथील सुनसान ठीकाणी एका पडक्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. यावर सदर ठीकाणी पाहणी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेली काळ्या रंगाची डी.एन.एस. एम. एस.स्कॉट कंपनीची सायकल किमत ६ हजार ५०० रुपये तसेच वेगवेगळ्या ठीकाणातुन चोरलेल्या इतर ५ सायकली अशा एकुण ३१ हजार ५०० रुपयांच्या ६ नग सायकल जप्त करून आज, सोमवार (दि. ७) रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून याने यापुर्वी दोन-तिन महिन्या अगोदर शहरातील दुर्गा चौक येथून एक दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.