राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर भाजप नेते राजकुमार बडोले यांनी खुलासा केला.  Pudhari Photo
गोंदिया

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर राजकुमार बडोलेंचा मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा
प्रमोदकुमार नागनाथे

गोंदिया : भाजप नेते तथा माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या असताना प्रसार माध्यमांतूनही तशा बातम्या झळकल्या होत्या. दरम्यान, या चर्चांना खोटे ठरवत आपण भाजपमध्ये होतो व पुढे भाजपमध्येच राहणार असून कोणत्याच पक्षाचे 'घड्याळʼ बांधणार नसल्याचे बडोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून अनेक नेते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात शिप्टींग करीत आहेत. गोंदिया जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर या दोन लोकसभा अंतर्गत गोंदिया, तिरोडा-गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व आमगाव-देवरी अशा चार विधानसभा आहेत. यात गोंदिया मतदारसंघात काही मोठ्या नेत्यांनी खांदेपालट केली असून सर्वप्रथम गोंदिया मतदारसंघातील माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना व गोपालदास अग्रवाल यांनीही भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. तर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आपण भाजप सोडून कुठे गेलोच नाही, असे बोलून भाजपच्या गोटात कायम झाले आहेत.

गोंदियात महायुतीतर्फे आमदार विनोद अग्रवाल यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षात जागा वाटपाला घेऊन खलबत सुरू आहे. त्यातच तिरोडा-गोरेगाव, आमगाव-देवरी व अर्जुनी-मोरगावात युती व आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अशावेळी अर्जुनी-मोरगाव क्षेत्रातून दोनदा भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी काही प्रसारमाध्यमांतून झळकल्या होत्या. तर तशा चर्चाही जिल्ह्यात रंगू लागल्या होत्या.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची चिंता वाढली होती. मात्र, गुरुवारी बडोले यांनी या सर्व अफवा असून प्रसारमाध्यमांतून प्रसारीत झालेल्या बातम्या खोट्या असल्याचे सांगत या बातम्यांशी आपला कोणताही संबंध नाही. गेल्या १५ वर्षांपासून आपण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असून पुढेही भाजपमध्येच राहणार असे पत्रकारांशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागले आहे.

भाजपचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आपल्याशी जुळलेला आहे. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत आहे. तेव्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असले तरी अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपलाच ही जागा सुटेल आणि भाजपच येथे लढेल, यात शंका नाही. तेव्हा कार्यकर्त्यांनी कसल्याच चुकीच्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.
- राजकुमार बडोले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT