Former MLA Rajan Teli resigns from BJP primary membership
माजी आमदार राजन तेली यांचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाFile Photo

माजी आमदार राजन तेली यांचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजन तेली हाती घेणार मशाल
Published on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून मशाल हाती घेत ते स्वग्रही परतणार आहेत. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. आगामी निवडणुकीत ते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार संबोधले जात आहेत. दरम्यान आज मातोश्रीवर त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश होत असल्याचे खात्रीलयक वृत्त आहे.

राजन तेली यांनी भाजपला पाठवलेल्या राजीनामा पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, आपणास पक्षाचे काम करत असताना माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे कुटुंबीयांकडून त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात आला. पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून आपण सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे. त्यांनी पाठवलेल्या राजीनामा पत्रामध्ये भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात आपण आपला भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मंजूर करणेबाबत देत असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी या पत्रामध्ये आपण गेली 10 वर्षे आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे दिवसरात्र मेहनत करून सर्वाना बरोबर घेऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आपण सर्वांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले. 2019 ला कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेचे सतीश सावंत यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी देवून आपल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे केले. म्हणून मला AB फॉर्म दिला होता. परंतू तत्कालीन भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री रविंद्र चव्हाण, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडून निरोप आला की, शिवसेनेकडून चूक झाली असेल तरी त्यावेळी आपण चुक करता कामा नये म्हणून मी AB फॉर्म पक्ष नेतृत्वाच्या आदेशामूळे दिला नाही.

त्याचप्रमाणे भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या राणे कुटूंबियांचा अंतर्गत होत असलेला त्रास तसेच सिंधुदूर्ग जिल्हा बँक 2019 वी विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघात वाढविण्यासाठी सर्वाना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. परंतू पुन्हा राणे कुटूंबीय भाजपात दाखल होवून आमचे खच्चीकरण करण्याचे तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत.

आपण घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलो. कष्टाने आपली राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे 100% प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही.

याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो हे मी समजू शकतो. तरी माझा भाजपा प्राथमिक सदस्य तसेच भाजपा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती त्यांनी या राजीनामा पत्रामध्ये केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news