गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नी, मुलगा व सासर्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत गुरूवारी (दि.९) ऐतिहासिक निकालात फाशीची शिक्षा ठोठावली आहे. किशोर श्रीराम शेंडे (रा.भिवापूर ता.तिरोडा) असे या आरोपीचे नाव असून त्याने आरती किशोर शेंडे, देवानंद सितकू मेश्राम (वय ५२), जय किशोर शेंडे ( वय ४) या तिघांची हत्या केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी किशोर हा पत्नी आरतीच्या चरित्र्यावर संशय घेवून तिचा नेहमी मानसिक व शारीरिक छळ करायचा, त्याच्या चाला कंटाळून आरती शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील सुर्याटोला येथे आपल्या माहेरी आली होती. दरम्यान, आरोपी किशोर हा नेहमी आपल्या सासूरवाडीत येऊन तिला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत असे. अशातच घटनेच्या दिवशी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्रीच्या सुमारास सुर्याटोला येथे सासूरवाडी गाठून त्याचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर पडवीत झोपले असताना त्यांच्यावर त्याने पेट्रोल टाकले. मात्र, देवानंद हे अर्धांगवायूने आजारी असल्याने त्याचा विरोध करू शकले नाहीत. किशोर यावरच न थांबता त्याची पत्नी व मुलगा झोपेत असताना त्याने पेट्रोल टाकून दाराची कडी ठोठावली. यावेळी पत्नीने दार उघडताच त्याने आग लावली. या आगीत सासरा देवानंद मेश्राम याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आरती व मुलगा जय (०४) हे दोघे ९० टक्के भाजले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला १६ मे २०२३ रोजी अटक करण्यात आली.
गुन्ह्यात आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे, परीस्थितीजण्य पुरावे, गोळा करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयात सदर प्रकरण विशेष खटला केस क्र. ६०/२०२३ अन्वये चालविण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी पूर्ण होऊन न्यायमुर्ती एन. बी. लवटे यांनी पुरावे व साक्ष तपासून आरोपीला दोषी ठरवले. दरम्यान गुरूवारी (दि.९) या प्रकरणाचा निकाल देत न्यायालयाने आरोपीला आरोपीला फाशीची शिक्षा, कलम ४३६ अन्वये आजन्म कारावास व १० हजार रूपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड.विजय कोल्हे यांनी बाजू मांडली. तर रामनगर पोलिस ठाण्यातंर्गत पैरवी अधिकारी म्हणून म.पो.हवा. नमिता लांजेवार, यांनी काम पाहिले.
गोंदिया जिल्हा न्यायालयाचा ऐतहासिक निर्णय…
जिल्हा निर्मिती १९९९ नंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता हा खटला फास्ट्रेक न्यायालयात चालविण्यात आला. या प्रकरणात नागपूरचे विशेष सरकारी वकील अॅड. विजय कोल्हे यांनी १९ साक्ष न्यायालयासमोर नोंदविले. ज्यामध्ये तदर्थ जिल्हा व सत्र न्यायधीश एन. बी. लवटे यांनी ऐतहासिक निर्णय देत आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा :