गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : आकृतीबंधाची अंमलबजावणी करा, यासह अन्य मागण्यांना घेवून उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात गोंदिया जिल्ह्यातील उपप्रादेशिक वाहन विभागाचे ३१ कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनाने उपप्रादेशिक परिवहन विभागासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी आकृतीबंध अंमलबजावणीचे शासन निर्णय निर्गमित केले होते. त्यामुळे कर्मचारी संघटनेने सहा वर्षे केलेल्या दीर्घ लढ्यास यश आले होते. अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अनुत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
अशा या धर्तीवर मागील दोन वर्षांत काही तांत्रिक बाबींचा बाऊ करून आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस टोलवाटोलवी केली जात आहे. आकृतीबंधाची अंमलबजावणी करावी या मागणीला घेऊन राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबर रोजीपासून बेमुदत संप पुकारलेला आहे, तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या संपात गोंदिया जिल्ह्यातील ३१ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आज, तिसऱ्या दिवशीही संप कायम असल्यामुळे जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे खोळंबली आहेत.