Paddy Threshing Machine Accident
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथे धान मळणी सुरु असताना थ्रेशर मशिनमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना बुधवारी (दि.२१) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सचिन देवराव हलामी (वय ३२, रा.इरुपटोला, ता.धानोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सध्या धान मळणीचा हंगाम सुरु असून, अलीकडे ग्रामीण भागातही मळणीसाठी थ्रेशर मशिनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. काल मुरमाडी येथे विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणी सुरु होती. अचानक सचिन हलामी याचा तोल गेला आणि तो मशिनमध्ये ओढला गेला. क्षणातच अर्ध्याहून अधिक शरीर मशिनमध्ये अडकल्याने आणि मशिनचा वेग प्रचंड असल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे सचिनच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
सचिन हा पूर्वी वनरक्षक म्हणून कार्यरत होता. परंतु एका प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून तो ट्रॅक्टरचालक म्हणून काम करुन उदरनिर्वाह करीत होता. मात्र, काळाने त्याच्यावर घाला घातला.