'हेलिकॉप्टर घ्या; पण तालुक्यात या साहेब'! गडचिरोलीत काँग्रेसचे आनोखे आंदोलन 
गडचिरोली

Gadchiroli | 'हेलिकॉप्टर घ्या; पण साहेब तालुक्यात या'! गडचिरोलीत काँग्रेसचे आनोखे आंदोलन

जिल्ह्यातील विविध कार्यालय प्रमुखांना हेलिकॉप्टरच्या प्रतिकृतीचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारुनही शेतकरी,मजूर,विद्यार्थी, महिलांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. प्रमुख अधिकाऱ्यांकडे लोकांना भेटायला वेळ नाही. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने आज 'हेलिकॉप्टर घ्या; पण गाव किंवा तालुक्यात या', हे अनोखे आंदोलन करीत विविध कार्यालय प्रमुखांना हेलिकॉप्टरची प्रतिकृती वाटप केली.

गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात आज दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेऊन विकासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चालल्या आहेत. वादळामुळे झालेल्या नुकसानीची न मिळालेली भरपाई, अवजड वाहतुकीमुळे वाढलेले अपघात, रस्त्यांची दयनीय अवस्था, विद्यार्थ्यांसाठी चांगल्या बसेसचा अभाव, रानटी हत्तींचा उपद्रव, खंडित होणारा वीजपुरवठा, घरकुलधारकांना रेती न मिळणे, अशा विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरची प्रतिकृती वाटप करुन निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भूपेश कोलते, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, घनश्याम वाढई, रमेश चौधरी,अनिल कोठारे,दिलीप घोडाम, भैयाजी मुद्दमवार, नंदू नरोटे, गुलाब मडावी, लालाजी सातपुते, चंद्रशेखर धकाते,महेश जक्कावार, वेंकटस्वामी जक्कावार,प्रभाकर कुबडे,जितेंद्र मुनघाटे, विजय सुपारे,शालिक पत्रे,श्रीनिवास ताटपल्लीवार,कुलदीप इंदूरकर,काशिनाथ भडके,उत्तम ठाकरे, चारू पोहने,संदीप भैसारे,हेमंत मोहितकर, राकेश रत्नावार, देवेंद्र ब्राह्मणवाडे,उमेश आखाडे, मनोज ढोरे,स्वप्नील ताडाम,स्वप्नील बेहरे, दीपक चौधरी, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, रिता गोवर्धन, शालिनी पेंदाम,कविता उराडे, सिद्धार्थ शेंडे, दीपक चौधरी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT