गडचिरोली

Gadchiroli Crime News: एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलले; दोघींना अटक

अविनाश सुतार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: अहेरी तालुक्यातील महागाव(बु)येथील कुंभारे परिवारातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. कुटुंबातीलच दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके अशी आरोपींची नावे आहेत. दोघींनी धातूमिश्रीत विष देऊन अतिशय थंड डोक्याने पाचही जणांचा जीव घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (Gadchiroli Crime News)

शंकर तिरुजी कुंभारे (वय ५५) हे महागाव(बु) येथील रहिवासी होते. गावातच त्यांचे फर्निचरचे दुकान होते. त्यांना पत्नी विजया (वय ४९), सागर (वय ३२) व रोशन (वय २९)  ही दोन मुले आणि कोमल विनोद दहागावकर (वय ३१) ही विवाहित मुलगी होती. सागर हा दिल्लीत पदव्युतर शिक्ष्ण घेत आहे. (Gadchiroli Crime News)

२२ सप्टेंबर २०२३ च्या रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे यांना अस्वस्थ वाटू लागले. शंकर कुंभारे यांनी तिला स्वत:च्या वाहनाने आलापल्लीतील दवाखान्यात नेले. परंतु काही वेळातच शंकर कुंभारे यांचीही प्रकृती बिघडली. त्यामुळे महागाव येथील राकेश मडावी नामक चालक दोघांनाही चंद्रपूरच्या दवाखान्यात घेऊन गेला. तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने राकेशने दोघांना नागपूरला हलविले. परंतु २६ सप्टेंबरला शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबरला पत्नी विजया यांनीही प्राण सोडला. दोघांच्या अंत्ययात्रेला मुलगी कोमल दहागावकर, मोठा मुलगा सागर आणि विजया कुंभारे यांची बहीण आनंदा उराडे आले होते. परंतु पुढे तिघांचीही प्रकृती बिघडली. शिवाय लहान मुलगा रोशन आणि वाहनचालक राकेश यांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सर्वजण दवाखान्यात भरती झाले. मात्र, उपचार सुरु असतानाच मुलगी कोमल दहागावकर हिने ८ ऑक्टोबरला प्राण सोडला. त्यानंतर १४ ऑक्टोबरला आनंदा उराडे यांची प्राणज्योत मालवली, तर लहान मुलगा रोशन याचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला.

२० दिवसांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक अशा पाच जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. कुणी विषबाधेने मृत्यू झाला म्हणत होते, तर कुणी घातपाताची शंका व्यक्त करीत होते. पोलिसांपुढेही पाच जणांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान उभे ठाकले होते. अखेर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चौकशीचे आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात चार तपास पथके गठित करण्यात आली. या पथकांनी गोपनीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि तेलंगणा राज्यातून माहिती काढली. तपास सुरु करताच पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास सुरुवात झाली. या

Gadchiroli Crime News  : आरोपी महिलांमध्ये लक्षणे नसल्याने संशय

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकारांना सांगितले की, शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पोस्टात नोकरीला आहेत. प्रेमविवाह मान्य न झाल्याने किंवा अन्य कारणाने काही महिन्यांपूर्वीच संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यू झालेल्या पाच जणांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. यातील पाचही जणांमध्ये जी लक्षणे दिसत होती; ती संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके(रोशन कुंभारेची मामी) यांच्यात दिसत नव्हती. त्यामुळे त्या ठणठणीत दिसत होत्या. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता भयावह माहिती पुढे आली.

दोघींनीही वादातून आखली पाचही जणांना संपविण्याची योजना

रोशनची पत्नी संघमित्रा कुंभारे हिला पोलिसांनी बोलते केले असता, आपण प्रेमविवाह केल्याने आपल्या वडिलांनी आत्महत्या केली. शिवाय सासू व सासरे माहेरच्या मंडळींच्या नावाने टोमणे मारुन त्रास देत होते,असे सांगितले, तर रोशनची मामी रोजा रामटेके हिने तिच्या सासऱ्याच्या नावावर असलेल्या ४ एकर शेतीतून विजया कुंभारे आणि तिच्या बहिणी हिस्सा मागत असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघींनीही पाचही जणांना विष पाजून ठार मारण्याची योजना आखली.

धातूजन्य विष पाजून थंड डोक्याने हत्या

सर्वांना संपविण्याची योजना आखल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी दोघींनी धोतऱ्याचे विष ऑनलाईन मागविले. परंतु ते विष पाण्यात टाकल्यानंतर हिरवे झाले. त्यामुळे उगीच शंका यायला नको म्हणून धोतऱ्याचा फॉर्म्युला त्यांनी रद्द केला. त्यानंतर रोजा रामटेके हिने तेलंगणात जाऊन जड धातूमिश्रीत विष(Heavy metal poison) आणले. हे विष पाण्यात टाकून पाहिले असता ते पाण्यात विरघळणारे, रंगहीन व चवहीन असल्याचे दिसून आले आणि आता काम फत्ते होणार असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी संधी मिळेल तेव्हा ते विष मृतकांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळले. दोन जणांना जेवणातून, एकाला डाळीतून तर दोन जणांना पाण्यातून विष देण्यात आले. या विषाचा पाचही जणांच्या प्रकृतीवर हळूहळॅ विपरित परिणाम झाला आणि शेवटी सर्वांनी एकापाठोपाठ एक प्राण सोडला.

राकेश मडावी नामक वाहनचालक हा कुंभारे परिवारातील नव्हता. परंतु शंकर व विजया कुंभारे यांना वाहनाने दवाखान्यात नेताना राकेशला तहान लागली. तेव्हा संघमित्रा व रोजा यांनी बाटलीत जडीबुटीचे पाणी आहे, ते पिऊन घे असे सांगितले. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. मोठा मुलगा सागर हा आई-वडिलांना बघायला आला, त्यालाही तेच पाणी पाजले. त्यामुळे तोही अस्वस्थ झाला. तसेच शंकर कुंभारे यांच्या साळीचा मुलगा हा त्यांना बघायला आला होता. तोदेखील आजारी पडला. सध्या तिन्ही आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. मत्यू झालेल्या पाचही व्यक्ती आणि आजारी असलेल्या तिन्ही व्यक्ती यांना हाता-पायांना मुंग्या येणे, कंबरेखालील भाग आणि डोक्याला प्रचंड वेदना होणे व ओठ काळे पडून जीभ जड होणे इत्यादी लक्षणे दिसून आल्याचे त्यांनी नीलोत्पल यांनी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT